शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अद्याप मंत्र्यांमध्ये खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान, अजित पवार आणि त्यांच्या गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी (१२ जुलै) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यापासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांच्याबरोबर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपावरून धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं बोललं जात होतं. परंतु या सगळ्या चर्चांमध्ये कसलंच तथ्य नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. तेव्हा त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला वेळ का लागतोय? असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्यावर पटेल म्हणाले, सध्याच्या मंत्र्यांमध्ये (भाजपा – शिंदे गट) आधीच खातेवाटप झालं आहे. काही खाती भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडे आहेत, तर काही खाती ही शिंदे गटातील मंत्र्यांकडे आहेत. सर्व खाती त्यांनी वाटून घेतली आहेत. आता आम्ही सत्तेत सामील झाल्याने कोणाकडून कोणतं खातं काढून घ्यायचं आणि आम्हाला द्यायचं, त्याचबरोबर त्या मंत्र्याचं खातं काढून घेतल्यावर त्याला दुसरं कोणतं खातं द्यायचं यावर विचार सुरू आहे.

हे ही वाचा >> ब्रिजभूषण सिंह यांच्या दुष्कृत्यांमध्ये ‘या’ सहकाऱ्याचा सहभाग, महिला कुस्तीपटूंना एकांतात बोलवायचा अन्…

प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्हाला काही खाती दिल्यावर आधीच्या मंत्र्यांना दुसरी खाती द्यावी लागणारच आहेत. आम्ही सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या खातेवाटपासंदर्भात सुरुवातीचे चार-पाच दिवस कोणतीही चर्चा झाली नव्हती. मागील दोन दिवसांपासून आम्ही हा विषय हाती घेतला आहे. काल यावर सखोल चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये यावरून कोणताही वाद नाही. चर्चा पूर्ण झाल्यावर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel answer on why maharashtra cabinet expansion taking time after meeting amit shah asc
Show comments