गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील ईडीच्या कारवाईची जोरदार चर्चा चालू आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाऊसमधील मालमत्तेवर ईडीनं गेल्यावर्षी टाच आणली होती. त्याला आता न्यायिक प्राधिकरणाने मान्यताही दिली असून आता पुन्हा त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदियामध्ये झालेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या एका जाहीर कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. सध्या प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीनं कारवाईचा बडगा उगारलेला असताना या दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर चर्चा केल्यामुळे तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. तपास यंत्रणांची भीती दाखवून इतर पक्षांतल्या लोकांना आपल्या पक्षात आणण्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने भाजपावर केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात फडणवीसांशी होत असलेल्या गुप्त चर्चांचा मिश्किलपणे उल्लेख केला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. “देवेंद्रजी आले आहेत. तुमच्यातले बरेच लोक विचार करत असतील की देवेंद्र फडणवीस इथे कसे? आता राजकारणात आतल्या-बाहेरच्या गोष्टी होतच असतात. त्यामुळे तुम्ही हे समजू नका. आमचं त्यांच्याशी खूप बोलणं होत असतं. गुप्त चर्चाही होत असते. यामुळे या व्यासपीठावरच्या बऱ्याच लोकांना त्रासही होऊ शकतो”, असं प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.

दर्डांचं मिश्किल विधान आणि पटेल-फडणवीसांची दाद!

दरम्यान, विजय दर्जा यांनी देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेलांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत, असं म्हणून या चर्चेत आणखी तेल ओतलं. “आता तुम्ही विचारलं की देवेंद्रजी इथे का आले आहेत? का आले नाही, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेत ते. हे जिथे जातात, तिथून काहीतरी घेऊन जातात. तुम्ही पाहिलं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये काय काय झालंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असंच येत नाहीत आणि असंच जात नाहीत”, असं विजय दर्डा यांनी म्हणताच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी हसून दाद दिली.

मुंबईः प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवरील टाचेला ईडी प्राधिकरणाची मान्यता

फडणवीस म्हणतात, “चर्चा तर होणारच”

यानंतर आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी याचा उल्लेख करत टोला लगावला. “मला फार आनंद आहे की प्रफुल्ल पटेलांनी मला निमंत्रित केलं. आता आपण दोघं इथे आहोत तर चर्चा तर होणारच आहे. बात निकली है तो दूर तक जाएगी”, असं फडणवीस म्हणाले.

“त्याची चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राची स्वत:ची एक संस्कृती असते. त्यामुळे इथे आपण विचारांचा विरोध करतो, व्यक्तीचा विरोध करत नाही. कधीकधी निवडणुकीत आपण एकदुसऱ्याचा खूप विरोध करतो. पण त्यातही आपण एकमेकांसोबत बसून चहा पिउ शकतो, व्यासपीठावर येऊ शकतो. जोपर्यंत ही संस्कृती आपल्यासोबत आहे, तोपर्यंत आपला विकास कुणी रोखून धरू शकत नाही”, असं म्हणत या भेटीगाठी आणि चर्चा राजकीय सौहार्दाच्या वातावरणात होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.