लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने लढत होत आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीकडून तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा राजकीय नेते वेगवेगळे विधानं करत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न खासदार प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रफुल पटेल यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक भाष्य केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, प्रफुल पटेल यांनी लोकसत्ताच्या लोकसंवादमध्ये बोलताना हे विधान केलं.

प्रफुल पटेल काय म्हणाले?

“मला शरद पवार यांच्याबाबत आयुष्यभर सन्मान राहील. मी कधीही शरद पवार यांना भेटेल. मला शरद पवार यांना भेटण्यात काहीही अडचण नाही. मागच्यावेळी नेहरू सेंटरला विश्वस्थांची बैठक होती. मी विश्वस्थ होतो. त्यामुळे मी तेथे गेलो होतो. एखाद्या संस्थेच्या कामासाठी किंवा मला शरद पवार कुठे दिसले आणि त्यांचे लक्ष नसले तरी मी त्यांच्याकडे जाईल आणि त्यांची विचारपूस करेल”, असं ते शरद पवार यांच्याबाबत बोलताना म्हणाले.

राष्ट्रवादी सत्तेत येण्याचे प्रयत्न चारवेळा फसले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? असा प्रश्न विचारला असता यावर प्रफुल पटेल म्हणाले, “राजकारणात काहीही होऊ शकतं. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं वाटलं होतं का? त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाला नेतृत्व मिळावं किंवा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं, यासाठी आणचा प्रयत्न का राहणार नाही? मात्र, प्रत्येक गोष्टीला आपल्याला रिअ‍ॅलिटीशी जोडूनच प्रयत्न करावे लागतात. इच्छा प्रत्येकाची असते. शरद पवार यांचीही पंतप्रधान होण्याची इच्छा होती, पण ते नाही झाले. जेव्हा संधी आली होती, तेव्हा त्यांनी ती गमवली”, असंही प्रफुल पटेल म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरू लागतात. यातच सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. असे असतानाच आता प्रफुल पटेल यांनी केलेल्या सूचक विधानानंतर विविध चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel interview on big statement to ajit pawar sharad pawar and ncp crisis politics gkt
Show comments