Praful Patel on Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे आजपासून (१८ जानेवारी) सुरू झालं आहे. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची बांधणी आणि इतर राजकीय विषयांवर हे अधिवेशन होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वादांमध्ये ज्यांचं नाव पुढे येत आहे असे मंत्री धनंजय मुंडे व पक्षावर नाराज असलेले छगन भुजबळ या अधिवेशनाना हजर राहणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. अशातच भुजबळांनी काही वेळ या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर ते तिथून निघून गेले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांच्या नाराजीबाबत पक्षातील नेते व खासदार प्रफुल पटेल यांच्याशी बातचीत केली. यावेळी पटेल म्हणाले, “हा आमचा अंतर्गत विषय असून आम्ही त्यावर नक्कीच मार्ग काढू”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्या नाराजी बद्दल तुम्ही बोलत आहात ती आमच्या घरातली गोष्ट आहे. मी कालच मुंबईत छगन भुजबळ यांना भेटलो आहे. काही गोष्टी असतात, परंतु त्यांची नाराजी टोकाची नाही किंवा अशी काही गोष्ट नाही जी आम्ही घरात बसून सोडवू शकत नाही. आम्ही त्यावर मार्ग काढू शकत नाही अशी स्थिती देखील नाही. निश्चितच छगन भुजबळ हे आमच्या पक्षाचा आधारस्तंभ आहेत आणि सुरुवातीपासून त्यांनी आमच्या पक्षाचं नेतृत्व केलं आहे. आम्ही १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हा छगन भुजबळ हे आमचे आघाडीचे नेते होते. आत्ता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही भुजबळ आमच्या पक्षाचे आघाडीचे नेते होते. यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचं नेतृत्व व मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहतील अशी आम्हाला खात्री आहे.

प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते प्रफुल्ल पटेल यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलं की तुम्ही ज्यांना आघाडीचे नेते म्हणत आहात त्याच नेत्याला पक्षात अपमानित केले जात आहे, अशी भावना त्यांच्या (भुजबळ) कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. भुजबळांनी देखील त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुम्ही त्या शब्दांचा वापर करत आहात, अपमानित वगैरे शब्द तुम्ही वापरत आहात ते शब्द योग्य नाहीत असं मला वाटतं. छगन भुजबळ स्वतः काही गोष्टी बोलले असतीलही, मी मात्र त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया देणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की छगन भुजबळ आणि आम्ही एका कुटुंबात व पक्षात काम करत आहोत. त्यांच्या मनात कुठली नाराजी नसावी आणि जर नाराजी असेलच तर आम्ही ती दूर करू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel reaction on chhagan bhujbal unhappy with ncp ajit pawar asc