शनिवारी अमरावतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत, असं ते म्हणाले होते. तसेच राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. दरम्यान, राज ठाकरे यांच्या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना राज ठाकरेंच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर आहे का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बनावट व्हॉटसॲप खाते, महाराष्ट्र्र सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

“लाडकी बहीण योजना असो, गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय असो किंवा मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय असो, या आणि इतर अशा अनेक कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. अजित पवार यांच्या सारखा संयमी अर्थमंत्री आपल्या राज्याला लाभला आहे. त्यांना पैसा कसा वाचवायचा याची माहिती आहे. त्यामुळे एकदा अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर त्याबाबत शंका उपस्थित करणं योग्य नाही. पुढची पाच वर्ष सुद्धा या योजना चालणार आहेत. इतक नाही, तर या योजनांतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्यदेखील वाढणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर नाही”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपावरही केलं भाष्य

पुढे बोलताना त्यांनी महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. “महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झालेले आहे. येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये जागा वाटपाबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तिन्ही पक्ष मिळून याबाबत सकारात्मक आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत, त्यासंबंधी सुद्धा विचार करण्यात आला आहे. जिथे जागांची अदलाबदल आवश्यक आहे, तिथे ती करण्यात येईल. तसेच कोण किती जागा लढणार? हा निर्णय सुद्धा लवकर घेण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली.

हेही वाचा – प्रफुल पटेल यांचा मोठा दावा; म्हणाले, “थोडा वेळ जाऊद्या, इंडिया आघाडीतील अनेक लोक…”

रोहित पवारांबाबत बोलताना म्हणाले…

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला १० ते १२ जागा मिळतील असं सर्वे सांगतो, असे रोहित पवार म्हणाले होते. याबाबत विचारलं असता, “रोहित पवारांनी म्हटलं म्हणजे सर्वे का? त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. मला कोणत्याही वादात पडायचं नाही. माझ्याकडेसुद्धा महायुतीचा सर्वे आहे. त्यामध्ये महायुतीला १७५ जागा मिळत आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel reaction on raj thackeray ladki bahin yojana govt employee salary spb