राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत बंडखोरी करून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. परंतु, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. चार दिवसांपूर्वी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावले होते. या होर्डिंग्सवर अजित पवारांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा केला होता. तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होतील याबाबत अनेक नेते वेगवेगळी मतं मांडत आहेत.
अजित पवार मुख्यमंत्री होणार का? अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्यांसमोर सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अजित पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी पटेल यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील. परंतु आता ती जागा (मुख्यमंत्रीपद) रिकामी नाही तर मग यावर चर्चा कशासाठी करताय?
हे ही वाचा >> दोन भाऊ एकत्र येणार का? राज ठाकरेंबरोबरच्या युतीवर उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आजच्या घडीला अजित पवार हे नक्कीच महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. नेतृत्व ही काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी ते मुख्यमंत्री होतील. ठीक आहे! काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या, उद्या नाहीतर परवा संधी नक्कीच मिळत असते. अनेक लोकांना ती संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारही आज नाहीतर उद्या नक्कीच मुख्यमंत्री होतील. उद्या म्हणजे उद्या नव्हे, कधीही, पुढच्या काळात कधी ना कधी त्यांना तशी संधी मिळेल. आम्ही त्या दिशेने काम करू.