अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यावर त्यांचे पक्षातले अनेक निकटवर्तीय नेते त्यांच्याबरोबर गेले आहेत. परंतु शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हेदेखील अजित पवारांबरोबर गेले आहेत. पटेल यांनी शरद पवारांची साथ कशी काय सोडली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आज स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी शरद पवारांकडे पाठिंबादेखील मागितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या समर्थक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी एक सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप कमी बोलतो. कमीच बोललेलं बरं. कारण मलाही एक दिवस माझं पुस्तक लिहायचं आहे, पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. हे पुस्तक जेव्हा प्रफुल्ल पटेल लिहिणार त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची अजिबात इच्छा नाही, किमान आज तरी तशी इच्छा नाही.

या वक्तव्याद्वारे प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार साहेबांची सावली असणारा मी या मंचावर, अजित पवार यांच्याबरोबर उभा आहे. यात जो इशारा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे.

हे ही वाचा >> “शरद पवार आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी…” छगन भुजबळ आक्रमक

“मी या मंचावर का?”

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. पंरतु याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार नाही. त्याची योग्य वेळ येऊ द्या. तुम्हाला आवश्यक असलेला खुलासा मी करणार आहे. आज छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्याचे संकेत दिले आहेत. मी ही यावर सविस्तर बोलेन. त्यावर आपण कधी ना कधी नक्कीच चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Praful patel says i will write book indirect warning to sharad pawar asc
Show comments