महाराष्ट्राच्या राजकारणात पाच महिन्यांपूर्वी मोठा स्फोट झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून पक्षाचे दोन गट तयार झाले. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदार-खासदारांना बरोबर घेऊन वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी आपणच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत भाजपाशी हातमिळवणी केली. तसेच भाजपा-शिवसेना महायुतीत प्रवेश केला आणि ते सत्तेत भागीदार बनले. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्याबरोबरचे आठ आमदार मंत्री झाले आहेत. दरम्यान, पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करत आहे. अजित पवार गटातील नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे याबाबतीत आघाडीवर आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना पक्षाबाबत अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपली भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ लाच युती होणार होती. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलादेखील ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचं असं ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली.
हे ही वाचा >> ‘शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत?’ कुणालाही माहीत नसणारी गोष्ट प्रफुल्ल पटेलांनी केली उघड, म्हणाले..
अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसं सहभागी करून घेतलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण त्यांना वाटत होतं की या युतीमुळे त्यांचं दिल्लीतलं महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु, शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतले पक्षश्रेष्ठी पवारांचंच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतोय.