शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता त्यातील समाविष्ट मंत्र्यांवरून राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. विशेषत: संजय राठोड यांच्या समावेशामुळे भाजपामधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर तीव्र शब्दांत टीका करताना संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच दुसरीकडे शिंदेगट आणि भाजपा सरकारमधील मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये जागा न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सूचक शब्दांत आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
बच्चू कडू यांनी याआधीही अनेकदा समाजकल्याण खातं मिळावं अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे. अपंग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला हे खातं हवं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांचा समावेश न झाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“मित्रपक्ष आणि अपक्षांना घ्यायला हवं होतं”
पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना घ्यायला हवं होतं, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. “खरंतर अपक्ष आणि मित्रपक्षांनी मिळून हे सरकार बनलं आहे. आमची मागणी होती की पहिल्या टप्प्यात मित्रपक्ष आणि अपक्षांना घ्यायला हवं होतं. काही कारणं असू शकतात. ती समजून घेऊ. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की महिन्याभरात जेव्हा मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा अपक्ष आणि मित्रपक्षाचा नक्की विचार केला जाईल. काही अडचणींमुळे या टप्प्यात विचार केला नसेल, तर बघू”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं”, मंत्रीमंडळ विस्तारावर अंजली दमानियांची टीका
शपथविधीवेळी बच्चू कडू विधिमंडळात!
दरम्यान, शपथविधी सुरू असताना बच्चू कडू मात्र विधान भवनात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर देखील त्यांनी खुलासा केला आहे. “विधानभवनात काही कामं होते. त्यामुळे शपथविधीला न जाता इथे येऊन तो वेळ आम्ही इथे कामी लावला”, असं ते म्हणाले.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार!
“बच्चू कडू स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही. पण दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. तेव्हा तुम्हाला संधी देऊ”, असंही ते म्हणाले.