अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन ५० खोके घेतल्याचा आरोप केल्यामुळे सुरु झालेला हा वाद अजून पेटला आहे. रवी राणांनी केलेल्या आरोपांवर मी शांत बसणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. दरम्यान ‘एबीपी माझा’ कट्ट्यावर बोलताना बच्चू कडू यांनी आपल्याला गुवाहाटीहून परत यायचं होतं असा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदेंसह इतर आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सूरतला गेले होते. त्यानंतर बंडखोर आमदारांनी आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला होता. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार वास्तव्यास होते. यामध्ये ‘प्रहार’चे बच्चू कडू यांचाही समावेश होता. दरम्यान त्यांनी आपल्याला गुवाहाटीहून परत यायचं होतं असा खुलासा केला आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“पुराव्य़ांशिवाय काही बोलू नये. जर काही पुरावे असतील तर आम्ही तुमच्या घरची भांडी घासू असं मी सांगितलं आहे. मी २० ते २५ वर्षांपासून काम करत आहे. आमचा बापजादा कोणीही राजकारणी नाही. पैसा, जात-पात, धर्म कधीही राजकारणात आणला नाही. कोणत्या पक्षाचा पाठिंबाही घेतला नाही. आम्ही काही तत्वं जपली आहेत. पण राजकारणात रणनीती आखताना काही तत्वं बाजूला ठेवावी लागतात, त्याचं दु:खही असतं. पण आता व्यवस्थाच इतकी बदलली आहे की समुद्रात गोड पाणी टाकण्याला अर्थ नाही,” अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

विश्लेषण: बच्चू कडू, रवी राणांमधील संघर्ष नेमका काय आहे? त्याची बीजे कशी पेरली गेली?

“आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मी गुवाहीटाला जाऊ नये असं अनेकांना वाटत होतं. अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन आले,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

“राजकुमार म्हणून आमचे एक आमदार आहेत, ते सर्वात आधी गुवाहाटीला गेले आणि नंतर मी गेलो. भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही. आम्हीदेखील नगरसेवकांना थांबवूनच ठेवतो,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prahar bachchu kadu on shinde faction guwahati maharashtra politics sgy
Show comments