आमदार रवी राणा यांनी अपक्ष आमदार बच्चू कडूंवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या दोघांमध्ये आधीपासूनच सुरू असलेल्या वादाची याला पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे हे आरोप थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जात असल्याचं खुद्द बच्चू कडू यांनीच म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार? याविषयी उत्सुकता असताना आता बच्चू कडूंनी एक तारखेला कोणता बॉम्बस्फोट करणार, याचे संकेत टीव्ही ९ शी बोलताना दिले आहेत. एक तारखेला एक व्हिडीओ जारी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.
रवी राणांचे आरोप, बच्चू कडूंचं प्रत्युत्तर!
पैसे घेऊन बच्चू कडूंनी सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी त्यांना परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “Sमी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्याही कानावर हे घातलं आहे. तरी तो आरोप करतोय. त्याला उत्तर द्यावं लागेलच. शांत राहिलो, तर लोक म्हणतील खोके घेतले. रवी राणा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आल्यानंतर त्यांच्या पत्नीने भाजपाला पाठिंबा दिला. तेव्हा तो पाठिंबा पैसे घेऊन दिला होता का? सगळे पैसे घेऊनच पाठिंबा देतात असं नसतं. त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विचार केला, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांचा विचार केला”, असं बच्चू कडू म्हणाले.
“त्यानी माझ्या मतदारसंघात येऊन म्हटलं की बाप बेटा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या.. बाप आणि भैय्यापेक्षा तुला रुपया मोठा असेल. मला नाही. ती तुझी औलाद असेल”, अशा शब्दांत कडूंनी रवी राणांवर टीकास्र सोडलं.
“उद्या या सगळ्यात माझी राख झाली, तरी माझ्याविरोधात झालेल्या आरोपांबद्दल मी पेटणार. मला मंत्रीपदाचं काही देणं-घेणं नाही. मी एवढा कच्चा माणूस नाही. मंत्रीपद काय ब्रह्मदेव पाठवतो का? माणूसच देतो. लोकांनी दिलेली आमदारकी मंत्रीपदापेक्षा लाख मोलाची आहे”, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले.
“आम्ही काही आंडूपांडू नाही”
“मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. आम्हाला राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत आम्ही. आम्ही घालून टाकू नांगर”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणांना सुनावलं आहे.
एक तारखेला कोणता बॉम्ब फोडणार?
बच्चू कडूंनी रवी राणांना आणि राज्य सरकारलाही एक नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्याआधी यासंदर्भात खुलासा करण्याचं किंवा पुरावे सादर करण्याचं आव्हान त्यांनी दिलं आहे. “एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार. कसं षडयंत्र रचलं जातं ते सगळं समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट १५ दिवसांनी पूर्ण होईल”, असं सूचक विधान बच्चू कडूंनी यावेळी केलं.