एकीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सत्ताधारी गटांमधील काही संबंधित आमदारांना मुंबईतच राहण्यासही सांगण्यात आल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुक असणारे बच्चू कडू मात्र अद्याप त्यांच्या मतदारसंघातच आहेत. यासंदर्भात त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मोठं विधान केलं असून आपण ११ वाजता आपली पुढील वाटचालीसंदर्भातली भूमिका जाहीर करणार आहोत, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे मंत्रीपदामुळे नाराज असणारे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेणार? यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
“मंत्रीमंडळ विस्ताराबाबत फोन आला आहे”
दरम्यान, मंत्रीपदी वर्णी लागणाऱ्या संबंधित आमदारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फोन गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी फोन आल्याची माहिती दिली आहे. “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला आहे. ११ वाजता मंत्रीमंडळात सामील होणार, नाही होणार वगैरे याबाबत माझी भूमिका मी जाहीर करणार आहे”, असं बच्चू कडू म्हणाले. “त्यांनी मला फक्त फोन करून बोलवलं आहे. विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत ११ वाजता मी भूमिका जाहीर करणार आहे”, असंही बच्चू कडू यांनी नमूद केलं.
गुरुवारी मंत्रीमंडळ विस्तार होणार? अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चेला उधाण
“मंत्रीमंडळ विस्तार का रखडला हे मला माहिती नाही. ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. पण आता इथून पुढे कशासाठी राजकारण करायचं? कुणासाठी काम केलं पाहिजे? पुढील वाटचाल कशी केली पाहिजे? यासंदर्भात मी बोलेन. हा निर्णय नेमका कुणाला धक्का देणारा असेल, इतरांना धक्का देणारा असेल की मलाच धक्का देणारा असेल ते तेव्हा कळेल”, असं बच्चू कडू म्हणाले.
भरत गोगावलेंनाही फोन गेला?
दरम्यान, इतर संबंधित आमदारांप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या भरत गोगावलेंनाही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा फोन गेला असेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे नेमकं मंत्रीमंडळात कुणाला सहभागी करून घेतलं जाणार? याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.