शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता त्यातील समाविष्ट मंत्र्यांवरून राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. विशेषत: संजय राठोड यांच्या समावेशामुळे भाजपामधूनच विरोध होऊ लागला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर तीव्र शब्दांत टीका करताना संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच दुसरीकडे शिंदेगट आणि भाजपा सरकारमधील मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये जागा न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रीपद नाही दिलं तर भांडायचं का? असं सवाल त्यांनी विचारला आहे. बच्चू कडू एवढ्या लहान विचांराचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले की, “मंत्रीपद मिळालं तरी चांगलं आणि नाही मिळालं तरी चांगलं आहे. आमचा उद्देश केवळ मंत्रीपद मिळवणं हा नाही. मी एवढ्या लहान विचारांचा माणूस नाही. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते त्यांचा शब्द नक्की पूर्ण करतील.”
हेही वाचा- “संजय राठोडांची माफी मागा” पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका
“मंत्रीपद नाही मिळालं तरी चांगलं” या बच्चू कडूंच्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता, बच्चू कडू म्हणाले की, “मंत्रीपद नाही दिलं तर त्यांना भांडायचं का? तेही स्वत: साठी भांडायचं का? शेतकऱ्यांसाठी भांडू की… मी काही कॅबिनेटपेक्षा कमी नाही. बच्चू कडू अकेलाही काफी है, सब के लिए…” असंही कडू यावेळी म्हणाले.