लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी तीन टप्प्यातील मतदान बाकी आहेत. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात ज्या मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या त्या संदर्भात अनेक नेते गौप्यस्फोट करत आहेत. आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीही या सर्व घडामोडींवर भाष्य करत सूचक विधानं केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जाऊन सरकार स्थापन केलं. मात्र, त्यावेळी आमदार बच्चू कडू कोणत्या अटीवर गुवाहाटीला गेले होते, याबाबत आता त्यांनी मोठं विधान केलं आहे. ते ‘एपीबी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : ‘मोदींसाठी मतं मागून माझी चूक झाली’, उद्धव ठाकरेंची कबुली; भाजपा पक्ष कधी फुटणार? तारीखही केली जाहीर

महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर ते महायुतीबरोबर होते. पण या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुतीबरोबर आहेत की नाही? याबाबत अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत.

यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आम्ही महायुतीबरोबर आहेत की नाही? याबाबत काहींची संभ्रमावस्था झाली असेल. मात्र, मी लोकांच्या बाजूने आहे. आम्ही सर्वसामान्य लोकांबरोबर राहतो. आम्ही कोणाबरोबर आहोत हा जनतेला नाही तर राजकीय लोकांना झालेला संभ्रम आहे”, असे ते म्हणाले.

ठाकरे गटाकडून अनेकदा गद्दार, खोके सरकार, खंजीर खुपसला अशा पद्धतीची टीका केली जाते. यावर बच्चू कडू म्हणाले, “आम्हाला याचं दु:ख आहे. आम्हाला लागलेला तो बट्टा आहे. आमची प्रतिमा लोकांसमोर खराब झाली किंवा केली जाते. मात्र, आम्ही त्याची चिंता करत नाहीत. कारण आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं. त्यामुळे आम्ही आमच्यावर लागलेले डाग आम्ही धूवून टाकले. बदनामीचा परिपाठ आमच्या पाठीमागे उभा राहत असेल पण दिव्यांग मंत्रालय आम्हाला भेटलं हा इतिहास आम्ही निर्माण केला”, असं बच्चू कडू म्हणाले.

गुहावाटीला का जावं वाटलं?

“महाविकास आघाडीत मंत्री असतानाही गुहावाटीला का जावं वाटलं? या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी आम्ही दिव्यांग मंत्रालयाबाबत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोललो होतो. मी राज्यमंत्री होतो तरीही दोन वर्षात ते झालं नाही. त्यानंतर आमच्या मते उठाव झाला. आमच्या मते उठाव होता. कारण बंडखोरीत काही भेटत नाही. उठावात आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. गुवाहाटीला जात असताना मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मात्र, त्यावेळी ते माणसिकता नव्हती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला दिव्यांग मंत्रालय देणार असाल तर मी येतो. त्यावेळी त्यांनी मान्य केलं, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर गेलो”, असं बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prahar sanghatna leader bachchu kadu big statement guwahati and eknath shinde shivsena rebellion politics gkt