मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबई विमानतळावर दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच या भेटीदरम्यान दाऊदने शरद पवार यांना सोन्याचा हार दिला, असेही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंतर आता खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“१९८८ ते १९९१ दरम्यान शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते, या काळात शरद पवार लंडनला गेले होते. तिथून कॅलिफोर्नियाला गेले, तिथे २ दिवस थांबले. कॅलिफोर्नियात त्यांनी एक बैठक घेतली. तिथून शरद पवार लंडनला परत आले. तिथून दोन दिवसांनी ते दुबईला गेले. दुबई एअरपोर्टवर त्यांची दाऊद इब्राहिमबरोबर भेट झाली, दाऊदने त्यांना सोन्याचा हार भेट दिला, तिथून शरद पवार पुन्हा लंडनला गेले आणि भारतात परतले”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा – शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे संभ्रम; मुख्यमंत्रीपदाबाबत इस्लामपूर, कराडमध्ये वेगवेगळी विधाने

“शरद पवारांच्या दौऱ्याची माहिती केंद्र सरकारला होती का?”

“केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही मुख्यमंत्र्याला विदेशात जाता येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला त्यावेळच्या सरकारची मान्यता होती का? कॅलिफोर्नियात शरद पवार यांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का? आणि शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची सरकारला माहिती होती का? याची उत्तर केंद्र सरकारने दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – पवारांनी २५ वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन अजित पवारांनी पाळले, इद्रिस नायकवडी यांचा शरद पवारांना चिमटा

“निवडणुकीच्या तोंडावर मी हे आरोप करतो आहे, कारण…”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्यात शांतता राखायची असेल तर अशा पक्षांना मतदान करायचे की नाही, हे जनतेला ठरावावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर मी हे आरोप करतो आहे, कारण राज्यात १९९० आणि २००० दशकाची परिस्थिती पुन्हा येईल, असं दिसते आहे. गोळीबारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. बाबा सिद्दीकींची उघडपणे हत्या करण्यात आली आहे. ही परिस्थिती पाहता मागचा इतिहास आपल्याला पाहायला हवा”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar allegation sharad pawar dawood ibrahim gold spb