प्रकाश आंबेडकर व ओवैसी यांचा दावा; अलोट गर्दीच्या साक्षीने एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडीचे मनोमीलन

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या गणिताला छेद देऊ शकणाऱ्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) आणि बहुजन वंचित आघाडीच्या एकत्रीकरणामुळे नव्या समीकरणाची नांदी ठरू शकेल, अशी अलोट गर्दी मंगळवारी औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर जमली होती. गावांगावातील ‘गल्ली-मोहल्ल्या’तून आलेल्या मतदारांसमोर या आघाडीमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली असल्याचा दावा बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवैसी यांनी केला. औरंगाबाद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते दोघे मंगळवारी एकाच व्यासपीठावर होते.

यावेळी बोलताना ओवैसी यांनी इतिहासातील दाखले देत केलेले भाषण अधिक प्रभावी झाले. ते म्हणाले, ‘इतिहास वाचला आहे, पण मोदींएवढा नाही. त्यांनी कुठली पुस्तके वाचली आहेत, माहीत नाही. पण २ ऑक्टोबर हा गांधी जयंती दिवस आहे, मला माहीत आहे. तरीही मी विनयाने सांगतो आहे, भारताच्या इतिहासात गांधी नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच महान  नेते होते, असे प्रतिपादन करत ओवैसी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीस राज्यभर आमचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे नि:संदिग्धपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध झाली. पतंगरावांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या चिरंजिवांच्याबाबतीतही असेच झाले. मग बाबासाहेबांच्या रक्तातील व्यक्तीला निवडून देताना हाच न्याय तुम्ही लावणार आहात का आणि तसे करणार असाल तरच तुम्हाला आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मानू, असे म्हणत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली. त्यांच्या भाषणातील हा धागा असदोद्दीन ओवैसी यांनी पकडला आणि नेतृत्व तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रकाश आंबेडकरांना उद्देशून म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फेडायचे असतील तर प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविले पाहिजे. त्यासाठी कंबर कसून कामाला लागूया, असे आवाहन ओवैसी यांनी केले. लोकसभेत त्यांना जाऊ दिले जात नाही. १९५२ च्या निवडणुकीतही डॉ. आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी हीच मंडळी कार्यरत होती. घटना काही रा. स्व. संघ किंवा नेहरू, गांधी परिवाराने दिलेली नाही किंवा जानवेधाऱ्यांनी दिली नाही. त्यामुळे ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी काम करणाऱ्या बहुजन वंचित आघाडीला आमचा पाठिंबा असेल, असे ओवैसी म्हणाले.

१९४६ साली डॉ. आंबेडकरांनी घटना समितीला पत्र लिहिले होते आणि त्यात म्हटले होते, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असावा. तसे मंत्रालय निर्माण करण्यासाठी २००५ हे साल उजाडावे लागले. डॉ. आंबेडकरांचे द्रष्टेपण हे असे दिसून येते. त्यांनीच के. एम. मुन्शी यांना अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत खडसावले होते. गांधींपेक्षा बाबासाहेब मोठे कसे, याबाबतचा युक्तिवाद ओवैसी यांनी अशा पद्धतीने केला.

७० वर्षांनंतर स्वत:चा अधिकार वापरण्यासाठी आपण सत्तेत येणार आहोत, ही भावना निर्माण करून सुरू केलेल्या या कामामुळे अनेकांना धडकी भरली असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. बदलाची ही सुरुवात मतदान होईपर्यंत अशीच कायम राहावी, असे म्हणत देशाची परिस्थिती भयावह असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण मिळायला सुरुवात झाली. आता त्यातील छोटा इतर मागासवर्गीय घटक निवडणुकीच्या प्रक्रियेतून अलगद बाहेर ठेवला जात आहे. त्याला परत आणण्याची खूणगाठ मनाशी बांधून काम करावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याची आठवण करून देत त्यांच्यावर टीका केली. बहुजन वंचित आघाडीला सत्ता मिळाल्यास राजेशाही संपलेली असेल. त्यांच्या परवान्याचेही नूतनीकरण  होणार नाही, ते सत्तेत राहणारच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Story img Loader