वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येच्या कटात हिंदू भटजींचाही समावेश होता, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. देशात सध्या जुन्या राजांची उदाहरणं देऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण ही खरी वस्तुस्थिती नाही, असं मत त्यांनी मांडलं. ते राजधानी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनेक ठिकाणी औरंगजेबावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु औरंगजेबाने ५४ वर्ष राज्य केलं. त्याने सुफी परंपरा जपली. मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांपेक्षा जास्त मुस्लीम लोक भारतात राहत असूनही या सुफी पंथामुळे तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये इथलं कोणी तिकडे गेलं नाही. १०-१२ माणसं सोडली तर इथलं कोणीच त्यांना जाऊ मिळालं नाही. हे जगाने मान्य केलं आहे. आपणही मान्य केलं पाहिजे.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, इथल्या होऊन गेलेल्या राजांच्या नावाने देशात चुकीचं नरेशन सेट केलं जात आहे. (चुकीच्या कथा सांगितल्या जात आहेत) त्या गोष्टी सांगून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कडवटपणा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला की, तुम्ही औरंगजेबाचं समर्थन करता का? तसेच तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन का केलंत? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी अभिवादन केलं म्हणजे त्याच्या कबरीवर फुलं वाहिली.
हे ही वाचा >> “तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरच्या वारीला येताना मटणाचा बेत!”, आमदार अमोल मिटकरींचा संताप, म्हणाले…
आंबेडकरांच्या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यामागे तुमचं नेमकं काय उद्दीष्ट होतं? त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात चुकीचं नरेटिव्ह चालवलं जात आहे, औरंगजेबावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा जो बेत होता, तो मला बाहेर काढायचा होता, तो थांबवायचा होता, दंगली थांबवायच्या होत्या. मी असं म्हणतो की, माझ्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि औरंगजेबाच्या निमित्ताने जी दंगल होणार होती ती थांबली.