राज्यात काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसींचा विरोध आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत ठोस काहीही निर्णय झाला नाही. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आता राज्यात एसी, एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“ओबीसींचा लढा हातामध्ये घ्या, सध्या जी परिस्थिती आहे ती भयानक होत आहे. असे मला काहीजण म्हणत होते. काहीजण नामांतराची आठवण करून देत आहेत आणि दोन गट हे पडत चाललेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. हा वाद काय स्वरुप घेईल याची सर्व ओबीसी संघटना आणि नेत्यांना जाणीव आहे. मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन सुरु केलं. आता आरक्षणासंदर्भात जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते मग यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले, “उपोषण करण्यापेक्षा…”

“मग राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यामध्ये तोडगा काढायचा असेल तर येथील श्रीमंत मराठ्यांचे जे पक्ष आहेत, हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत. तोपर्यंत तोडगा निघत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तिगत सर्वांना पत्र लिहावं. मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्या, ही मागणी आहे, यावर राजकीय पक्षांची भूमिका काय, यावर विचारणा करून तोडगा काढण्यात येईल. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की, आम्ही पत्र लिहू. मात्र, अद्याप याबाबतचे पत्र आलेलं नाही”, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

“मराठा आणि ओबीसींमधील हा वाद आता फक्त मराठवाड्यापुरता आहे असं मी मानत नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश इकडे पसरत चालला आहे. त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांची एक मागणी होती की वंतिच बहुजन आघाडीने यावर भूमिका मांडावी. ती भूमिका गावोगावी गेली पाहिजे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की या सार्वजनिक संघटनांना बरोबर घेऊन २५ जुलै रोजी दादार येथील चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव (OBC Reservation) जनसंवाद यात्रेची सुरुवात करायची. त्याच दिवशी पुण्यातील फुलेवाडा या ठिकाणी जायचं आणि २६ जुलै रोजी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा सुरु करायची”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

ही जनसंवाद यात्रा कोठे काढली जाणार?

“आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा ही कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना यासह अजून काही जिल्ह्यात काढण्यात येणार आहे. तसेच या यात्रेची सांगता ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे. या यात्रेत बैठका आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. तसेच यामध्ये ओबीसींसाठीच्या प्रमुख मागण्या करण्यात करण्यात येणार आहेत. यामध्ये ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे, एसटी एससीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशीपमध्ये वाढ झाली पाहिजे, यासह आदी मागण्या करण्यात येणार आहेत”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar big announcement to obc reservation protection mass communication yatra will be held gkt