Prakash Ambedkar Blame EVM For VBA assembly election loss : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने बहुमताचा आकाडा पार केला आहे. यानंतर राज्यात भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार आहे. यादरम्यान निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागलेल्या विरोधकांनी मात्र निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमवर शंका घेत आहेत. यादरम्यान विधानसभेत एकही जागा जिंकू न शकलेल्या वंचित बहुजन आघाडीनेदेखील ईव्हीएम विरोधात मोहिम जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा व्हिडीओ देखील पोस्ट कण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर ईव्हीएममुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत खाते उघडू न शकल्याचा आरोप केला आहे.
वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलन पुकारले असून स्वाक्षरी मोहिमेपासून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील मतदारांना व्हिडिओच्या माध्यमातून ईव्हीएमविरोधातील स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा>> विधानसभेतील अपयशानंतर शरद पवार मोठा निर्णय घेणार? रोहित पवारांचं सूचक विधान; म्हणाले,…
२००४ पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ते ईव्हीएमविरोधात न्यायालयीन लढाईही लढत आहेत. ईव्हीएम वापरातील अनेक घोटाळे त्यांनी पत्रकार परिषदेतून मांडले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएमविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या विभागात ही मोहीम राबवणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी सोबत यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना स्वाक्षरी महिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी त्यांचा पक्ष निवडणुकीत खाते उघडू न शकल्याबद्दल ईव्हीएमला दोष दिला आहे. “विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, या निवडणुकीत ईव्हीएम वापरण्यात आले, ईव्हीएमसंबंधी अनेक घोळ झाल्याची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार होती, पण या ईव्हीएममुळे खातं उघडलं नाही अशी परिस्थिती आहे. तमाम मतदारांना आवाहन आहे आम्ही सह्यांची मोहिम सुरू करतोय, की ईव्हीएम नको आणि घोटाळा झाला आहे. मी आवाहन करतो की मतदारांनी या मोहिमेत सहभागी व्हावं कारण आपल्यालाही असंच वाटतंय”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.