महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी आंबेडकर यांनी मविआमध्ये चालू असलेल्या चर्चेबाबतची माहिती दिली. थोरातांबरोबरच्या भेटीबाबत आंबेडकर म्हणाले, आमचं या भेटीचं आधीच ठरलेलं. थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठे नेते आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टींवर चर्चा करण्यासाठी ते आज आम्हाला भेटले. तसेच सध्या प्रसारमाध्यमांवर दाखवलं जात आहे की, महाविकास आघाडीची आज बैठक आहे. परंतु, ती चुकीची माहिती आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला मविआ बैठकीबाबत जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), उद्धव ठाकरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि मी एकत्र बसून लवकरच चर्चा करणार आहोत. त्यांच्यात सध्या काही जागांवरून भांडण चाललंय, तसेच इतरही काही विषय आहेत ज्याची मला माहिती दिली जाणार आहे. मविआत ते आम्हाला किती जागा देऊ शकतात, कोणत्या जागा देऊ शकत नाहीत. आम्ही किती जागा मागणार यावर ही चर्चा अवलंबून आहे. खरंतर, त्यांचंच (मविआ) काही ठरत नाहीये. त्यामुळे त्यांच्यात जी चर्चा आहे त्यात वंचितची काहीच भूमिका नाही.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, महाविकास आघाडीत जागांसदर्भात आतापर्यंत काही निर्णय झाला आहे का? यावर आंबेडकर म्हणाले त्यांचीच भांडणं आहेत… मी तुम्हाला त्यांच्या भांडणांसदर्भात सांगतो. त्यामुळे तुम्ही प्रसारमाध्यमांनी वंचितच्या मागे लागणं जरा थाबवलं पाहिजे. तुम्ही बातम्या देताना वंचितच्या मागे लागत आहात अशी परिस्थिती आहे. १० जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद आहेत. तर पाच जागा अशा आहेत जिथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असून त्यांचं तिथे काही ठरलेलं नाही.

हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांची भूमिका संशयास्पद आहे का? संजय राऊत म्हणाले…

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातल्या एकंदरीत लोकसभेच्या १५ जागा अशा आहेत ज्यावर मविआ नेत्यांचं एकमत झालेलं नाही. ही आमची माहिती मी तुम्हाला दिली आहे. मविआतील त्या तीन पक्षांचं ठरत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागेंमधील एखादी जागा आम्ही मागायची ठरवली तर नेमकं कोणाशी बोलायचं तेच ठरलेलं नाही. त्यामुळे या १५ जागांचा तिढा सुटल्याशिवाय ते लोक आमच्याशी बोलू शकत नाहीत आणि जागावाटपाचा निर्णय होऊ शकत नाही.

Story img Loader