राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, या विधानाबाबात प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा – “शरद पवार भाजपाबरोबर आहेत म्हणणं…”, संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना सुनावले खडेबोल; म्हणाले…
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. “भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भाडण लावणे, मतभेत निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात”, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली.
दरम्यान, नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही असं विधान केलं होते. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आमची युती ही फक्त शिवसेनेशी झाली आहे. वंचित आघाडीच्या महाविकास आघडीतील प्रवेशासाठी उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू आहे”, असं ते म्हणाले.
हेही वाचा – “आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम झालं”, नरेश मस्केंचं विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या स्वागताला…”
“आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत”, अशी प्रतिक्रियाही प्रकाश आंबेडकरांनी दिली.