एनआयएने गुरुवारी (२२ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर देशभरात खळबळ माजली. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, या यंत्रणांनी कारवाईत देशविरोधी कारवायांबाबत काय पुरावे मिळाले हे आगामी २४ तासात लोकांसमोर मांडावं,” असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लीम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो.”

देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले?

“असं असलं तरी राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि आपण जे कागदपत्रे गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं,” असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना केले.

हेही वाचा : “नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय, दारूड्याला पैसे..”, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र!

“…तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते”

“तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपाचा मुस्लीम विरोधी अजेंडा आहे. तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल, तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

Story img Loader