शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर उद्धव ठाकरे समर्थक, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम असून आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत ही महाविकास आघाडी कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. असे असताना बंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात मोठे विधान केले होते. त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसशी आम्ही युती करायला तयार आहोत, असे सांगितले होते. याच भूमिकेबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आता अधिक भाष्य केले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला आमच्याकडून निरोप गेला आहे. आता त्यांनीच युतीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते जालना शहरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात नेमका फरक काय? नारायण राणे स्पष्टच बोलले; म्हणाले…
वंचित बाहुजन आघाडीच्या महाराष्ट्र समितीच्या रेखा ठाकूर या अध्यक्षा आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वीच काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका घेतली होती. युती करायची असेल तर ती काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करू. मात्र अद्याप काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका अस्पष्ट आहे. ही भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सर्वच पक्ष वेगवेगळे लढतील असे आम्ही गृहीत धरले आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागलो आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…
वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेशी युती करण्यास तयार आहे. तसा प्रस्तावही उभय पक्षांना पाठवण्यात आला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यास तयार नाही. त्यामागे नेमके कारण काय आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी थेट बोलणे टाळले आहे. आम्ही आमच्याकडून निरोप पाठवलेला आहे. आता त्यांनी या निरोपाला उत्तर देण्याची गरज आहे. राष्ट्रवादीशी युती करण्यास आम्ही तयार का नाही? याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.