सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले असून, मनोज जरांगे यांनी जर निवडणूक लढवली नाही, तर ते पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहेत हे स्पष्ट होते असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.
सांगली दौऱ्यावर असलेल्या ॲड. आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले, विधानसभा निवडणुका होणार, की पुढे ढकलल्या जाणार, ही साशंकता आता संपली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकमुळे निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. २९ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक होणे आवश्यक आहे. या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून, दि. ८ ते १३ ऑक्टोबर दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू शकते. १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल.
हेही वाचा >>>मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत
शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत, अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांची मागणी टाळत आले. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील, असेही ॲड. आंबेडकर म्हणाले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, की राज्यात २२ ठिकाणी दंगली घडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जनता सुज्ञ झाली असून, आता वास्तववादी विचार करत आहे. त्यामुळे या प्रयत्नाला यश मिळाले नाही. बेरोजगारी, शेतमालाला हमीभाव आणि गावगाड्याच्या विकासाचे महत्त्वाचे मुद्दे पुढे येत असून, ही सकारात्मक बाब आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला ८८ जागा, तर उर्वरित दोनशे जागा काँग्रेस व शिवसेना यांच्या वाट्याला येतील. तिसऱ्या आघाडीबरोबर आपण जाणार नाही असे सांगत ते म्हणाले, की लोकसभेवेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना विनाअट पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मदतीची आम्हाला अपेक्षा नाही.