अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे ४ तरुणांना झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्यांची शारीरिक विटंबनाही करण्यात आली. यानंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. आता या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरोपींवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी रविवारी (३ सप्टेंबर) ट्वीट करत आक्रमक पवित्रा घेतला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी १ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे जाऊन पीडित ४ मुलांची भेट घेतली. एका पीडित मुलाला पायाने ओढल्यामुळे आणि उलटे लटकवल्यामुळे त्याचा पाय सुन्न झाला आहे. पीडित चारही मुलांवर खूप मोठा मानसिक आघात झाला आहे. या घटनेतील आरोपींवर मोक्का आणि तडीपारीची कारवाई करावी.”
हेही वाचा : Video: “…म्हणून सरकारने जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केला”; संजय राऊतांचं मोठं विधान
“मुलांवर झालेला हल्ला देशातल्या प्रत्येक वंचितावर झालेला दहशतवादी हल्ला”
“या मुलांवर झालेला हल्ला देशातल्या प्रत्येक वंचित, बहुजन, धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांकावर झालेला दहशतवादी हल्ला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपुख्यमंत्री अजित पवार यांना मागणी करतो की, सर्व आरोपींवर इतर गुन्ह्यांसह मोक्का (MCOCA) आणि एमपीडीए ( MPDA) कायदा १९८१ अंतर्गत गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि पिडीत मुलांना योग्य न्याय मिळालाच पाहिजेत”, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.