Prkash Ambedkar : परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) आक्रमक झाले आहेत. त्यांनी हल्लेखोरांना अटक करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराच दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय घडलं परभणीत?

परभणीत संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर परभणीत आज बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. ज्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, परभणीतील या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी सरकारला इशारा दिला असून येत्या २४ तासांत सर्व हल्लेखोरांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

हे पण वाचा- ‘‘ईव्हीएमविरोधात राहुल गांधींनी यात्रा काढण्याची गरज नाही”, प्रकाश आंबेडकर यांचे मत; म्हणाले…

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनांमुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा, असे आवाहन ॲड. आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. येत्या २४ तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध.”

परभणीत बंदला हिंसक वळण

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आला असून या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आलीय. काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन मोडवर आल्याचा दिसून येते पोलिसांनीही या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळाले तसेच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच परभणी या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहण्यास मिळते आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनीही इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar gave warning said arrest people in parbhani within 24 hours who insulted constitution scj