Prakash Ambedkar meets Devendra Fadnavis : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमधील हिंसाचार प्रकरण आणि पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्याशी संबंधित प्रकरणावर चर्चा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच आंबेडकरांनी फडणवीसांपुढे वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. यापैकी काही मागण्या मुख्यमंत्री फडणवीसांनी मान्य केल्याची माहिती स्वतः आंबेडकर यांनी दिल्ली आहे. आंबेडकर यांनी एक्सवर यासंबंधीची एक पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आज सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परभणीच्या प्रकरणासंदर्भात बराच वेळ चर्चा झाली. पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत ही किरकोळ असून, त्यांना एक कोटींची भरपाई देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी. परभणी प्रकरणात चौकशी करून ज्यांनी निरपराध नागरिकांना क्रूरपणे मारहाण केली आहे. अशा पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ती मागणी त्यांनी मान्य केली आहे. आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन काही नागरिकांच्या घरांची मोडतोड करण्यात आलेली आहे. अशा नागरिकांना शासनाने नुकसानभरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थांच्या डीबीटीसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे.

हे ही वाचा >> मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर

प्रकाश आंबेडकर यांनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

यासह आंबेडकर यांनी इतरही मागण्या केल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की परभणीत पोलिसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा. १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती पसरवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी. परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar meets devendra fadnavis parbhani violence news somnath suryawanshi asc