शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख करू नये, अशी भूमिका मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबर संघर्ष करून राखीव जागा पदरात पाडून घेतल्या. सर्वचदृष्टय़ा वंचित घटकांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक सर्वागीण स्वरूपाची प्रगती साधून इतर समाज घटकाच्या बरोबरीने मागासवर्गीय समाजाला स्थान मिळवून देण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. वर्णहीन व वर्गहीन समाज व्यवस्था खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाल्यास प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सर्वच घटक एकत्र येतील. परंतु केवळ कागदावरून जात हटविल्याने मनातील जात नष्ट होईल का, हा खरा प्रश्न आहे. प्रत्येकाने व्यवहारातून जातीय भावना नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितपणे राष्ट्रीय भावना वाढीस लागेल, असेही कटारे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
अजूनही खेडय़ापाडय़ात मागासवर्गीयांची अवस्था दयनीय आहे. अजूनही ते मूळ प्रवाहापासून कोसो दूर असताना प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका दलितविरोधी नाही का, देशात जातीच्या आधारावरच राजकारणाची गणिते मांडली जातात हे कधी थांबणार आहे, प्रकाश आंबेडकरांना नेमके कोणत्या समूहाचे नेतृत्व करावयाचे आहे, असे प्रश्नही कटारे यांनी उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा