Prakash Ambedkar On Akshay Shinde Encounter : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही यावर भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. “कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला का? अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते”, असे अनेक सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“अक्षय शिंदे या आरोपीला कशाच्या शोधासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते? कोणालातरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेला आहे का? पोलिसांना लागलेली गोळी मांडीला लागलेली आहे अशी माहिती समोर येत आहे. मग याबाबतचे मेडीकल रिपोर्टही समोर यायला हवे, गोळीबार करणारा व्यक्ती समोरासमोर गोळीबार करतो. मग ती गोळी मांडीला कशी लागली?”, असे अनेक प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत.

बदलापूर प्रकरण नेमकं काय?

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. २० ऑगस्ट रोजी बदलापूर मधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करत जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती. दरम्यान, अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on akshay shinde encounter in thane police and badlapur case gkt