Prakash Ambedkar on Aurangzeb tomb row Nagpur Violence : छावा नावाचा चित्रपट १४ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात औरंगजेब आणि त्याची महाराष्ट्रातील त्याची कबर हे मुद्दे चांगलेच चर्चेत आले आहेत. समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनीही औरंगजेब हा उत्तम शासक होता असं म्हटलं होतं, त्यानंतरही बराच वाद निर्माण झाला. यानंतर औरंगजेबाची कबर उखडून टाकली जावी अशी मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावर राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिंसाचाराच्या घटना देखील घडल्या. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाची कबरीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राज्याच्या बाहेरचे लोक औरंगजेबाची कबर हा राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
नागपूर हिंसाचारानंतर दोन्ही बाजूच्या लोकांवर तसेच खोटी अफवा परवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आङे. ते या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले की, “कारवाई व्हायची असेल तर दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नाही. तिला दोन हात लागतात. अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हा १९९२ साली जे यूपी होतं तो होऊ नये. येवढी खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अन्यथा औरंगजेबाची मजार हे राज्याच्या बाहेरची लोकं एक राष्ट्रीय मुद्दा करू पाहात आहेत. अयोध्याचा आता राजकीय फायदा नाहीये. औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहे, त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातील कारभार राहणार,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
नागपूर येथे नेमकं काय झालं?
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने महाल, गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबचा प्रतिकात्मत पुतळा सोमवारी जाळला. त्यानंतर सांयकाळी दोन गटात वाद निर्माण झाला होता आणि यानंतर परिसरात दंगल उसळली. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते रक्तबंबाळ झाले होते. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाले आहेत.