महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केले होते. त्यानंतर आता पुन्हा आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या पत्रावर ज्या आमदारांच्या सह्या आहेत त्या प्रत्येक आमदाराला बोलवून खरचं त्यांनी सही केली आहे का? हे विचारावे तसेच केली असेल तर कोणत्या मानसिक अवस्थेत केली हे सुद्धा विधानसभा उपाध्यक्षांनी विचारावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आमदारांच्या पाठिंबा असलेले पत्र दिले आहे. मात्र, राज्यात फ्लोअर टेस्ट घेतल्याशिवाय सरकार बसखास्त करता येणार नाही. या अगोदर न्यायलयानेही राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदेंकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार असले तरी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाटी त्यांना आपला गट भाजपामध्ये विलिन करावा लागेल. त्यानंतर त्याचे शिवसेना म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. एकनाथ शिंदे या सगळ्या गोष्टींना तयार होतील का? असा प्रश्नही आंबेडकरांनी विचारला. तसेच भारतीय जनता पक्षाकडून सगळे पत्ते उघडण्यात आलेले नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची भाजपाने कोंडी केली आहे. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात अजून बरेच काही होणे बाकी असल्याचेही आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटनंतर खळबळ
सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.