मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात उपोषण करत आहेत. त्यांनी नऊ दिवसात अन्नाचा कणही खाल्ला नाही. त्यांना सध्या आंदोलनस्थळीच सलाईन लावण्यात आली आहे. त्यांची प्रकृती हळुहळू ढासळताना दिसत आहे. दरम्यान, विविध पक्षांचे नेते आंतरवली सराठी येथे जाऊन आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्र सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकीय नेत्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासनं ही सर्व नौटंकी आहे, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यांनी एक ट्वीट करत मराठा आरक्षणावरून राज्यातील प्रमुख नेत्यांवर टीकास्र सोडलं.

हेही वाचा- “…तर ते उपोषण सोडायला तयार”, मनोज जरांगेंच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “बारा वाजेपर्यंत…”

प्रकाश आंबेडकर ट्वीटमध्ये म्हणाले, “उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यासारख्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सर्वोच्च न्यायालयात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही? त्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते. ताकद उभी केली असती. धोरण बदलायला दडपण आणले असते.”

हेही वाचा- “आरक्षण देणार नाही, असं कोर्टानेही…”, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचं विधान

“याउलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटीमुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांमध्ये तणाव वाढला आहे. सर्व रयत मराठ्यांना माझं आवाहन आहे. यातून दंगल न घडवताही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही, तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घ्या. याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पद्धतीने पुढे रेटता येईल”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on political leaders meeting with manoj jarange maratha reservation protest in jalna rmm