अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

आगामी निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वाटत नसल्याने संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बकरा बनविण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आपल्या विधानाला पुष्टी देतांना ज्येष्ठ स्वयंसेवक भय्याजी जोशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत  मोदी यांचे नाव न घेता सत्तेत असणाऱ्यांना तेच सर्वेसर्वा असल्याचे वाटते, तसेच सध्या राजा कोण, हे सर्वांना माहीत असल्याचे विधान केले होते, याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक येथे घेतली. तत्पूर्वी विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नोटबंदीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. तसेच सर्जिकल स्ट्राइकची सत्यता वादग्रस्त ठरल्याने संघाने हात झटकले असावेत आणी मोदी यांनाच सर्वस्वी जबाबदार धरून आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

राज्यात होऊ  घातलेला मंत्रिमंडळ विस्तार हे गाजर आहे. या मंत्रिमंडळात नव्याने एकाचाही समावेश होईल असे वाटत नाही. राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षाला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. इंधन दरवाढीच्या नावाखाली बोलविलेल्या बैठकीचा कार्यक्रमा वेगळाच असून त्याचा मूळ उद्देश आपण दोन दिवसात जाहीर करणार, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातही शेतकरी अडचणी असतांना येथे व्यापाऱ्यांना अभय आहे. याविरोधात काँग्रेसला आवाज उठविता आला नाही.  सरकारच्या मर्जीने शेतकऱ्यांची लूट होत असताना कॉंग्रेस त्याबाबत काहीही करू शकली नाही, असा टोला त्यांनी लगावला. मी टू मोहिमेचे त्यांनी समर्थन केले. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल महिला बोलू लागल्या ही चांगली गोष्ट आहे. काही महिलांकडून त्याचा दुरूपयोग होत आहे. नाहक महिलांनी कोणाची बदनामी करू नये, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी नमूद केले.

Story img Loader