शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा वेळीच बंदोबस्त केला असता तर आता ही वेळ आली नसती, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करत टीकास्र सोडलं.
हेही वाचा- “भाजपा आणि भिडेंचं साटंलोटं आहे, हे आता सिद्ध झालं”, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया…
प्रकाश आंबेडकर ट्वीटमध्ये म्हणाले, “भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती.”
हेही वाचा- “…महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही”, फडणवीसांचा संभाजी भिडेंना इशारा
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
अमरावतीच्या बडनेरामध्ये झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान केलं. “मोहनदास हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले.