वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात आणि देशात जातीयता आणि धर्मांधतेतून अन्याय अत्याचार सुरू असल्याचा आरोप करत त्या विरोधात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे बहुजन, अल्पसंख्याक जनआक्रोश महासभेचं आयोजन केलं. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हरेगावात गरीब मराठा विद्यार्थ्यालाही उलटं टांगून मारल्याचा आरोप केला. तसेच शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं. ते शुक्रवारी (१ सप्टेंबर) राहुरीतील सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “हरेगाव प्रकरणात गायकवाड नावाचा विद्यार्थी आहे. तो गरीब मराठ्यांमधील विद्यार्थी आहे. त्यालाही उलटं टांगून मारलं आहे. त्याच्याही मनात त्या तिघांसारखीच भीती आहे. तो मला म्हणत होता की, माझ्या आई-बापाला मारलं जाईल. इथल्या गब्बर झालेल्या मराठ्यांची युती ब्राह्मणशाहीशी झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं.”
“गरीब मराठ्यांचं आरक्षण कुणाच्या राजवटीत गेलं”
“खालच्या कोर्टाने गरीब मराठ्याला आरक्षण दिलं. ते आरक्षण कुणाच्या राजवटीत गेलं. गरीब मराठ्यांनी विचार केला पाहिजे. त्यावेळी केंद्रात राज्य कुणाचं होतं. तेव्हा सत्तेत भाजपा होता. इथल्या गरीब मराठ्याकडे श्रीमंत मराठा बघायला तयार नाही, त्याला उमेदवारी द्यायला तयार नाही,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“गरीब मराठ्याचं आरक्षण भाजपाने काढलं”
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “श्रीमंत मराठे गरीब मराठ्याला ग्रामपंचायत निवडणुकीतही उभं करायला तयार नाहीत. त्याला आरक्षणाच्या माध्यमातून फायदा होणार होता. मात्र, त्याच्यासमोरील ताट कुणी काढलं असेल, तर ते भाजपाने काढलं. असं असताना आज तोंडदेखलेपणा केला जातो. आज हेच श्रीमंत मराठे सांगतात की, आम्ही गरीब मराठ्यांसाठी लढतो.”
व्हिडीओ पाहा :
“माझं शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की…”
“जेव्हा लढायचं होतं तेव्हा हे श्रीमंत मराठा का लढले नाहीत. आता सगळं संपलं आहे, तेव्हा हे सांगतात लढा. माझं शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की, त्यांनी गरीब मराठ्यांचा प्रश्न कोर्टाच्या ऐरणीवर कसा आणणार हे आधी सांगा. केवळ आम्ही लढणार, आम्ही लढणार सांगत आहेत. पाच वर्षे झालीत. मी गरीब मराठ्यांना आवाहन करतो की, त्यांनी वंचितबरोबर यावं. गरीब मराठ्यांचा प्रश्न पुन्हा राज्यपालांमार्फत कोर्टाच्यासमोर घेऊन जाऊ शकतो,” असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : जालन्यात मराठा आक्रोश मोर्च्यावर लाठीचार्ज, फडणवीसांचं नाव घेत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“इच्छा असती तर ते हे करू शकले असते”
“आणण्याची इच्छा असेल, तर मी सांगितलेला मार्ग काही नवा मार्ग नाही. इच्छा असती तर ते हे करू शकले असते. मात्र , त्यांची इच्छाच नव्हती त्यामुळे त्यांनी ते केलं नाही,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.