छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तविकपणे सुरत लुटलं नव्हतं. मात्र, सुरत लुटल्याचा खोटा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या विधानावरून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. दोघांनी माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवरायांचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे..”, संजय राऊत यांची टीका
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला आव्हान उभे केले होते. त्यांनी अलुतेदार, बलुतेदार यांचे सैन्य उभे केले. त्याचं शल्य आजही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी महाराजांची माफी मागायला हवी. पण ते माफी मागणार नाही, हे मला माहिती आहे”, अशी प्रतिक्रियाही प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ओबीसी समाजाच्या संघटनांबरोबर चर्चा केली आहे. जिल्हा पातळीवर समन्वय समिती आणि प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रभरातील आदिवासी समाजाला एकत्र करण्याचं काम आम्ही करतो आहे. येत्या ९ किंवा १० तारखेला यासंदर्भात मुंबईत घोषणा होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.