आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. महायुतीत भाजपाला शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा सोडण्याची कसरत करावी लागत आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. जागावाटपाचे त्रांगडे दिवसेंदिवस गुंतागुतींचे होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या भूमिकेमुळे मविआसमोरच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
टिव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात दहा जागांवरून एकमत झालेले नाही. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात पाच जागांवरून एकमत झालेले नाही. त्यांच्यात एकमत झाल्यानंतर आम्ही चर्चेत सहभाग घेऊ शकतो. त्यांचे एकमत होत नाही, तोपर्यंत आम्ही बघ्याच्या भूमिकेत आहोत. पुढे होणाऱ्या बैठकीत आम्ही सहभागी होऊ, त्यात काय ठरते ते पाहून निर्णय घेऊ.”
महाविकास आघाडीत जागावाटपावरून भांडण, प्रकाश आंबेडकरांचा भर सभेत दावा; म्हणाले, “५ जागांमुळे…”
भाजपाशी हातमिळवणी करणारे धुतल्या तांदळासारखे…
वंचित भाजपाची बी टीम आहे का? असे आरोप नेहमी होत असतात. याबद्दल प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही या प्रश्नावर कुणाला उत्तर देण्यासाठी मोकळे नाही. ज्यांनी भाजपाबरोबर याआधी सत्ता स्थापन केलेली आहे. त्यांनी आपण धुतल्या तांदळासारखे आहोत, असे दाखवू नये. आता ते धुतल्या तांदळेसारखे झाले आहेत, म्हणूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे की, तुम्ही यापुढे भाजपा बरोबर जाणार नाहीत, असे मतदारांना लिहून द्या. जर मतदारांना असे लेखी उत्तर दिले, तर मतदार पाठिंबा देईल. अन्यथा मतदारांना जो अर्थ काढायचा तो ते काढतील.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही अजून आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. तीन पक्षांचे भांडण संपल्यानंतर आमच्याशी चर्चा सुरू होईल. अद्याप त्यांचीच भांडणे संपलेली नाहीत तर मग आमच्याशी काय चर्चा होणार आहे. १२ ते १६ मार्चपर्यंत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यांची भांडणे संपतील आणि ते आमच्यासोबत चर्चेला बसतील अशी अपेक्षा आहे.