वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत फोनवरून चर्चा झाली असून राज्यात लवकरच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा असा नवा प्रयोग होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “ते प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले?,” एकनाथ शिदेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच मंचावरुन केलं भाष्य
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“महाविकास आघाडी आजही अस्थित्त्वात आहे आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यामुळे माध्यमांशी ज्या युतीच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्या त्यांनी बंद कराव्यात. यामुळे केवळ संभ्रम निर्माण होतो आहे” , अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
“मी गेले अनेक दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत मी माहिती घेतो आहे. त्यामुळे युतीची कोणतीही चर्चा अद्याप नाही. माध्यमांशी राजकीय पक्षांचे लग्न लावणं बंद करावं”, असेही ही ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघेही युतीबाबत पक्षपातळीवर चाचपणी करत आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरेंवरील वरील एका कार्यक्रमानिमित्तानं मुंबईत व्यासपीठावर असणार आहेत.