वसंत मोरे यांनी अवघ्या तीन महिन्यात वंचित बहुजन आघाडीला जय महाराष्ट्र केला आहे. तसंच ९ जुलै रोजी ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरेंनी मनसेची साथ सोडली. राज ठाकरेंच्या फोटोला लोटांगण घालणारे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. आता त्यांनी लोकसभा लढवल्यानंतर आणि त्यात डिपॉझिट जप्त झाल्यावर वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंवर हल्लाबोल केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

आज दीक्षाभूमिजवळ झालेल्या आंदोलनामुळे वंचितच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी प्रकाश आंबेडकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकरांना यावेळी वसंत मोरेंबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी तीन महिन्यांत वंचितची साथ सोडणाऱ्या वसंत मोरेंवर हल्लाबोल केला.

वसंत मोरेंबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“वसंत मोरेंचं राजकारण हे आयाराम गयारामांप्रमाणे आहे. त्यांना माणसं ओळखता येत नाहीत. त्यामुळेच त्यांच्याकडून सातत्याने या गोष्टी घडत आहेत.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केलं आहे. “लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत. मात्र गॅसचे दर कधी कमी होणार आहेत? महिलांना अन्न धान्य पुरणार का? माझ्या बहिणींची फी भरली जाणार का? हे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

हे पण वाचा- वसंत मोरेंच्या शिवबंधनाने हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत पेच?

वसंत मोरेंनी नेमकं काय म्हटलं?

मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला. साहेब मला माफ करा असं मी त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. मला माझ्या पाठिशी असणार्या कार्यकर्त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय हा विचार करुनच घेतला आहे. मला प्रकाश आंबेडकरांचा फोन आला होता पण मी त्यांना सांगितलं की आता खूप उशीर झाला आहे. मी गुरुवारीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता मी पूर्वीच्या पक्षात जात आहे असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

लोकसभेला वसंत मोरेंचं डिपॉझिट जप्त

वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ जुलैला वसंत मोरे हे ठाकरे गटात रितसर प्रवेश करतील. याबाबत बोलताना वसंत मोरे यांनी म्हटले की, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे. वयाच्या १८-१९ व्या वर्षी मी इकडेच शिवसेनेची शाखा सुरु केली. ३१ वर्षांचा होईपर्यंत मी शिवसेनेतच होतो. त्यामुळे आता मी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जुलै रोजी मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवबंधन बांधणार आहे असंही वसंत मोरेंनी म्हटलं आहे.