राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं टाळावं, असा संजय राऊतांनी दिली होता. दरम्यान, यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
हेही वाचा – शरद पवारांसदर्भात केलेल्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “ते वक्तव्य मी…”
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
आज सकाळी माध्यमांशी बोलताना, प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी शरद पवारांबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे, त्यांच्यावर टीका करणं टाळलं पाहिजे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. याबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारलं असता, ”हा सल्ला जर उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी मानला असता”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांबाबात केलेल्या विधानावरही स्पष्टीकरण दिलं. ”इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही”, असं ते म्हणाले.
हेही वाचा – …तर आम्ही भाजपासोबतही जायला तयार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांवरील विधानावर विचारलं असता, “प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारची विधानं करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच “भाजपाच्या यंत्रणांनी सर्वात जास्त हल्ले शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली आहे. अपेक्षा आहे, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचे घटक होतील. पण, महाविकास आघाडीचा भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे,” असा सल्ला सल्ला ही त्यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला होता.