आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी याच लोकसभा निवडणूक आणि भाजपाची रणनीती महत्त्वाचं विधान केलंय. भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्यात असं आव्हानच प्रकाश आंबेडकरांनी दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“भाजपाने फक्त १५० जागा जिंकून दाखवाव्यात. निवडणुकीच्या मैदानात त्यांनी १५० जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे, असे मी मानतो. भाजपाला चुकीची माहिती मिळत आहे. पक्ष फोडून आम्ही ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असे त्यांना वाटत आहे. ते पक्ष फोडू शकतील, नेते विकत घेऊ शकतील. मात्र ते मतदारांना विकत घेऊ शकणार नाहीत. मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

४०० पेक्षा अधिक जागां जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उभी फूट पडली. बंड केलेले दोन्ही गट आता महाराष्ट्रात भाजपाशी युती करून सत्तेत सहभागी आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन महत्त्वाच्या पक्षांत पडलेली उभी फूट ही भाजपासाठी फायद्याची आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही काँग्रेस तसेच इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जातोय. बडे नेते पक्षात येत असल्यामुळे तसेच देशात पंतप्रधान मोदींचा मोठा प्रभाव असल्यामुळे आम्ही देशात ४०० पेक्षा अधिक जागा जिंकू असा दावा भाजपाकडून केला जातोय.

२ फेब्रुवारी रोजी वंचितचा महाविकास आघाडीत समावेश

दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्याआधी प्रकाश आंबेडकर आणि नाना पटोले यांच्यात राजकीय मतभेद झाले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मविआत जागा मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. परंतु, मतभेद विसरून काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील दाखवला आणि महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar said bjp cant win 150 seats in general election 2024 prd
Show comments