Prakash Ambedkar : वाघ्या या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. या मागणीला संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाकेंनी विरोध दर्शवला आहे. याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

संभाजी भिडे यांनी काय म्हटलं आहे?

वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य आहे. त्यामुळेच त्याचं स्मारक उभारण्यात आलं आहे. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. देशाशी आपल्याला एकनिष्ठ रहायचं आहे याचं द्योतक म्हणून ते स्मारक हवंच. वाघ्या कुत्र्याच्या नावावर जे चाललं आहे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक आहे. ती कुत्र्याने उडी घेतली ही कथा सत्य आहे. असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजी भिडेंबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री आहेत. अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते जो कुणी राजदंड हाती घेतो त्याला राज्य चालवता आलं पाहिजे. जो कायद्याला मानत नाही त्याला आतमध्ये टाकण्याची संधी असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस आत टाकलं नाही, संभाजी भिडेंना पाठिशी घातलं आणि एका दृष्टीने बळ दिलं. ती चूक आता पुन्हा करु नका ही माझी अपेक्षा आहे. एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

सौगात ए मोदी या योजनेबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

भाजपाकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लीम समुदायाला ३२ लाख सौगात-ए-मोदी किट वाटण्यात येणार आहेत. या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला लक्ष्य केले. इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेलं आहे. रेल्वेचे डबे जुने घेतले, जळाले नाही आणि आतून जळालेत. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केलं जातं आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईडट्रॅक करायचं, हा भाजपा आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे सौगात ए मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. हा राजकीयदृष्टीनं केलेला हा कार्यक्रम आहे.