राज्यात उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. या नव्या प्रयोगामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे. आगामी काळात संघ, भाजपाने आपल्या विचारधारेत बदल केला, तर चर्चा करण्यास हरकत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तरं देत होते.

हेही वाचा >> “शरद पवार आजही भाजपाबरोबर”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अजित पवारांनी…”

…तर आम्ही त्यांचाही विचार करू

संघासोबतच्या वैचारिक मतभेदाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर भाष्य केले. “भविष्याबद्दल मी सांगू शकत नाही. मात्र सध्यातरी माझी भाजपाला पूरक असणारी भूमिका नाही. आमच्यातील मूलभूत वैचारिक मतभेदावर भाजपा, आरएसएस बोलायला तयार असतील, स्वत:ला बदलायला तयार असतील तर आम्ही विचार करू. काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काढलेला आहे, तो आम्हाला मान्य नाही. आंबेडकरी चळवळ तो मान्य करत नाही. ओबीसी, भटके, दलित यांना न्याय द्यायचा असेल, तर धर्माच्या सामाजिक विभागात हस्तक्षेप करणे गजरेचे आहे. त्याशिवाय त्यांची मुक्तता अशक्य आहे. कारण ही गुलामगिरी वैदिक धर्मातून निर्माण झालेली आहे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा >> निवडणूक आणि उमेदवारीबद्दल विचारताच सुषमा अंधारेंचे खास उत्तर; म्हणाल्या, “आमच्याकडे लेट पण…”

मी कोणाचाही गुलाम नाही, मी स्वतंत्र आहे

“मतभेदांवर बोलण्यासाठी तुम्ही चार पावलं पुढे या, आम्ही चार पावलं पुढे येतो. एकत्र बसायला सुरुवात करू. मग त्यातून तुमच्यासोबत राजकीय चर्चा करू. त्याआधी नाही. मी कोणाचाही गुलाम नाही. मी स्वतंत्र आहे. मला उद्या भाजपासोबत जायचे असेल तर मला थांबवणारं कोण आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकारिणीला विचारात घेऊन आम्ही निर्णय घेतला तर मग आम्हाला थांबवणारे कोण आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आम्हाला थांबवणार का. ते उगीचच आमच्यावर आरोप करतात,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

Story img Loader