शिवसेनेत बंडखोरी होण्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. भाजपाने बंडखोर एकनाथ शिंदे गटाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर तर हा आरोप वारंवार केला. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला एकनाथ शिंददेखील नको आहेत, असं मोठं विधान केलं. तसेच भाजपाला एकनाथ शिंदेंचं ओझंही उतरवायचं आहे, असं म्हटलं. ते शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) यवतमाळमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत. त्यांना जसे उद्धव ठाकरे नको होते, तसेच एकनाथ शिंदेही नको आहेत. हे ओझंही त्यांना उतरवायचं आहे. त्यांना परिस्थिती त्यांच्या बाजूने दिसली तर ते निवडणुका घेणं पसंत करतील.”

“आत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाची आणि भाजपाची युती होते का हे पाहावं लागेल,” असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही.”

“सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर…”

“शिवसेनेच्या कोणत्याही गटाबाबत सकारात्मक नाही. मात्र, व्यवस्थेचा विचार केला, तर माझ्या दृष्टीने, पक्षाच्या दृष्टीने जे चुकीचं सुरू होतं त्याबाबत मी माझी भूमिका मांडली. त्यात मी कायद्याची बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अनियंत्रित अधिकार दिले, तर काय होऊ शकतं याची सर्वोच्च न्यायालयानेच मांडलेली जंत्री मी लोकांसमोर मांडली,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

“सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे”

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “दुसरं एखाद्या मुख्यमंत्र्याने कायदेशीर पेचप्रसंग तयार झाल्याने राजीनामा दिला, तर पुन्हा सरकार स्थापनेबाबतचा अधिकार राज्यपालांना आहे का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने त्या काळातील संकेत महत्त्वाचे आहेत. ते संकेत सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही भूमिका घेतोय की, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेची तपासणी केली पाहिजे.”

हेही वाचा : VIDEO: “आम्ही दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला, पण…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

“मला असं दिसत होतं की अनेकजण हे मानायलाच तयार नव्हते. सभापतींनी १६ जणांच्या निलंबनावरील स्थगिती उठवली की नाही याचा कोठेही खुलासा होत नाही, अशी स्थिती आहे,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar say bjp do not want eknath shinde like uddhav thackeray waiting for opportunity rno news pbs