Prakash Ambedkar on NCP : “महायुतीत अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे आगामी काळात आमचा पक्ष वेगळा विचार करू शकतो”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी अलीकडेच केलं होतं. त्याचबरोबर, “भविष्यात अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेन”, असंही मिटकरी म्हणाले होते. पवार व आंबेडकर हे दोन नेते एकत्र आले तर राज्याच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलू शकते”, असंही मिटकरी म्हणाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. वंचित आणि राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा चालू नसून हे दोन पक्ष सध्या तरी एकत्र येणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ते म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते केवळ महायुतीत त्यांचा फायदा व्हावा म्हणून वंचितचा वापर करू पाहतायत.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा दोन पक्षांची आघाडी होण्याबाबत चर्चा चालू नाही. मला असं वाटतंय की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा वापर करू पाहतेय. ‘आम्ही चाललो वंचितकडे, आम्हाला थांबवायचं असेल तर आमच्या विधानसभेच्या जागा वाढवा’ अशा पद्धतीने ते महायुतीशी चर्चा करत असावेत, असं मला वाटतंय. अजित पवारांचा पक्ष विधानसभेला महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आमचा (वंचित बहुजन आघाडीचा) शिडी म्हणून वापर करू पाहतेय असं सध्या तरी दिसतंय.

प्रकाश आंबेडकर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

…तर अजित पवारांचं राजकारण पुन्हा स्थापन करू : आंबेडकर

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांचं राजकारण पुन्हा स्थापन करू शकतो असा दावा केला आहे. आंबेडकर म्हणाले, मी अजित पवारांना म्हटलंय की त्यांनी महायुतीमधून बाहेर पडावं, आमच्याबरोबर यावं, आम्ही त्यांचं राजकारण पुन्हा होतं तसं स्थापन करून देऊ.

हे ही वाचा >> Vishalgad : “हा खरंच शिवाजी महाराजांचा किल्ला आहे?” विशाळगडाची अवस्था पाहून संभाजीराजेंचा प्रश्न; म्हणाले, “स्थानिक लोकप्रतिनिधींनी…”

अजित पवार-प्रकाश आंबेडकरांना एकत्र आणण्यासाठी अमोल मिटकरी प्रयत्न करणार?

आमदार अमोल मिटकरी म्हणाले होते, “मी या दोन मोठ्या नेत्यांना एकत्र आणण्याइतका मोठा नाही. या गोष्टी वरिष्ठ पातळीवर होतात. परंतु, एक दुवा म्हणून काम करण्यास हरकत नाही. मला माझ्या पक्षाने सांगितलं तर मी अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊ शकतो. आमच्या भूमिका त्यांच्यापुढे मांडू शकतो. मी प्रकाश आंबेडकरांकडे केवळ वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून पाहत नाही. तर ते बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे आणि मी त्यांच्याचरणी नेहमीच नतमस्तक होत असतो. मी अधून-मधून त्यांना भेटत असतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar says ajit pawar ncp using vba to get more assembly seats in election in nda asc