महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. येत्या सहा डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करू शकता. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काहीही होऊ शकतं, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात मुस्लीम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केलं जात आहे. समाजांमध्ये अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्या लोकांचा त्यासाठी वापर केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी मुस्लीम संघटनांची मुंबईत एक बैठक पार पडली. मुस्लीम संघटना आठ डिसेंबर रोजी पॅलेस्टाईनच्या विषयावर सभा घेणार आहेत. मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजपा त्याकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे.
दरम्यान, यावेळी पत्रकांनी प्रकाश आंबेडकर यांना राज्यात चालू असलेल्या ओबीसी आंदोलनाबाबत आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारली. यावर आंबेडकर म्हणाले, “कालच्या सभेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.” राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ओबीसी आंदोलन चालू आहे. भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकरांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला कोणाची गरज नाही. आंबेडकरवाद, फुलेवाद, शाहूवाद हा एवढा सक्षम आहे की त्याला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. त्या विचारात एवढी ताकद की ते शाश्वत आहे.
हे ही वाचा >> “६ डिसेंबरनंतर देशात…”, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती, म्हणाले, “ओबीसींचं आरक्षण…”
दरम्यान, आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, छगन भुजबळ हे ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत म्हणून तुम्ही त्या आंदोलनात सहभागी होत नाही, असं बोललं जात आहे. यावर काय सांगाल. या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुम्ही पत्रकारांनी तुमचा इतिहास विषय सुधारून घ्यायला हवा. तुम्ही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्रातला जो ओबीसींचा लढा चालू आहे, या लढ्याचा जनक हा प्रकाश आंबेडकर आहे, हे लक्षात ठेवा. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. भुजबळांवरच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझी त्यांच्यावर कसलीच नाराजी नाही.