मारामाऱ्या आणि हल्ले हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये. वेळ पडल्यास डाव्या चळवळीकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी अख्खा नक्षलवाद आहे. त्यामुळे ‘सनातन’ने एकदा ही सगळी हिंसा कशासाठी याचे उत्तर द्यावे, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (भारिप) नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.  ते सांगली येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सनातन ही संस्थाच जबाबदार असल्याचा दावा केला. ‘सनातन’च्या अनेक मासिकांतून आपल्या विचारसरणीच्या विरोधात जे आहेत त्यांना संपवले पाहिजे, असा संदेश आपल्या साधकांना देण्यात आलेला आहे. तसेच, समीर गायकवाड हा आपला साधक असल्याचे सनातनने यापूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे पानसरे यांच्या हत्येमागे ‘सनातन’चाच हात असल्याचे सिद्ध होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
याशिवाय, काही दिवसांपूर्वी समीर गायकवाडच्या बचावासाठी रिंगणात उतरलेल्या वकिलांच्या संघटनेने पत्रकारपरिषद घेऊन ‘आमच्या वाटेला जाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा दिल्याचेही आंबेडकरांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी समीर गायकवाडला केवळ एक संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या समीर गायकवाडच्या फोनवरील संभाषणात पानसरे यांच्या हत्येचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्यामुळे तो आता केवळ संशयित राहिलेला नाही. पानसरे आणि गायकवाड यांचे व्यक्तिगत भांडण असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पानसरेंची हत्या व्यक्तिगत भांडणातून नाहीतर मग कशामुळे झाली? मग त्याचा एकच अर्थ निघतो तो म्हणजे ही हत्या सनातन संस्थेने अनेक मासिकांतून वारंवार आपल्या साधकांना दिलेल्या आदेशांमुळे झाली आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले.

Story img Loader