Prakash Ambedkar Eknath Shinde : “खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे”, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच आंबेडकर म्हणाले, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला आहे.” लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि मविआ नेत्यांच्या बाजूने असणारे प्रकाश आंबेडकर आता मविआ नेत्यांवर टीका करू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईतील ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. या भेटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत हे पक्ष वेगवेगळे लढले. ठाकरे गट महाविकास आघाडीबरोबर होता तर वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता.
प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीबरोबर (काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) एकत्र येऊन निवडणुकीला सामोरा जाईल असं चित्र निर्माण झालं होतं. चारही पक्षांमध्ये याबाबत अनेक बैठका, चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र ही आघाडी होऊ शकली नाही. अखेर प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेला. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येईल अशी चर्चा होती. अद्याप तसं झालेलं नाही, उलट वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास विकास आघाडीमधील नेत्यांवर टीका करत आहेत, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचं कौतुक कत आहेत.
मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढला : प्रकाश आंबेडकर
मराठा व ओबीसी आरक्षणावरून प्रकाश आंबेडकर मविआ नेत्यांना धारेवर धरत आहेत. दुसऱ्या बाजूला ते सत्ताधाऱ्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “शिवसेनेची पारंपरिक मतं एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला. शिवसैनिक एकनाथ शिंदेंनाच खरे शिवसेनाप्रमुख मानू लागले आहेत. तसेच शिवसेनेची मतं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचं आपण पाहत आहोत. मात्र आरक्षणवादी लोक आणि मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढला आहे.”
हे ही वाचा >> Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीसंदर्भात म्हणजेच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसंदर्भात घेतलेली भूमिका मी दुर्दैवी मानतो. उद्धव ठाकरे हे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. आपली भूमिका स्पष्ट करण्याऐवजी ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. त्यांनी आरक्षण वाढवलं तर मराठा समाजाला न्याय मिळेल. ही ठाकरेंची भूमिका मला पटलेली नाही.