वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. देशातलं वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकतं. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, दुर्दैवाने देशात मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या आरक्षणाला लक्ष्य केलं जातंय. ज्यांचा या लढ्याशी संबंध नाही, ओबीसींच्या लढ्याशी संबंध नाही, ते हा लढा आपल्या ताब्यात घेऊन दंगली करतील. या दंगली कशा वाढतील अशा स्वरुपाची वक्तव्ये केली जात आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सध्या देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. आंबेडकर म्हणाले होते, ३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल. प्रकाश आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित संविधान सन्मान महासभेत हे वक्तव्य केलं होतं.
हे ही वाचा >> “आदित्य ठाकरेंसह संजय राऊत लवकरच तुरुंगात असतील”, नारायण राणेंचं सूचक विधान, म्हणाले…
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली होती. आंबेडकर म्हणाले होते, सध्या देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजांना एकमेकांविरोधात लढवलं जातं आहे आणि हे थांबवण्याऐवजी त्यास खतपाणी घातलं जातं आहे. २००२ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात मोठा नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या.