काँग्रेसला दिलेल्या पत्रात अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
अकोला : गांधीवादावर चालणारा काँग्रेस पक्ष जेव्हा हिंदुत्ववादी होता, तेव्हा देशातील धर्मनिरपेक्ष जागा संकुचित होतात. काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. काँग्रेस व राष्ट्रवादीने दिलेल्या पत्रावर त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला.
वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीत समावून घेण्यासंदर्भात २८ फेब्रुवारीला काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने प्रकाश आंबेडकर यांना पत्र देण्यात आले होते. त्यावर अॅड. आंबेडकर यांनी पत्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे.
त्या पत्राला उत्तर देताना अॅड. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून काँग्रेससोबत आघाडी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. सप्टेंबर महिन्यापर्यंत काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आघाडी होण्यासाठी तीन मुद्दे मांडले होते, त्यावर पत्र मिळेपर्यंत खुलासा करण्यात आला नाही. आता पत्रात चार जागा देण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, प्रश्न केवळ जागांचा नाही, तर काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देत आहे. सॉफ्ट हिंदू आणि सॉफ्ट हिंदुत्ववादी यामध्ये फरक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक भाग आहे. देशात धर्मनिरपेक्षता कायम राहण्यासाठी संघाला संविधानाच्या चौकटीत आणणे गरजेचे आहे. वंचित समूहांच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर धर्मनिरपेक्ष पक्ष हे केंद्रस्थानी असले पाहिजे, असे म्हणून संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसकडे अनेक घटनातज्ज्ञ व वकील आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी मला पत्राद्वारे उपाय विचारणे म्हणजे आघाडीचा चेंडू आमच्या कोर्टात टोलावण्यासारखे आहे. या प्रश्नावर राजकारण न करता काँग्रेसच्या विधि व न्याय शाखेकडे हा प्रश्न मांडून त्यांनी दिलेला सल्ला हा मसुदा म्हणून चर्चेला घेत पुन्हा एकदा आघाडीच्या चर्चेला सुरुवात करावी, असा प्रस्ताव देखील त्यांनी काँग्रेसपुढे मांडला. काँग्रेसप्रणीत महाआघाडीतील सहभागी सर्व पक्षांमधील विधि तज्ज्ञ यांची समिती गठित करून या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते, असेही ते म्हणाले.
२०१४ च्या निवडणुकीत एकही जागा भारिप-बमसंला देण्यास असमर्थता दर्शवणारी काँग्रेस २०१९च्या निवडणुकीत सुरुवातीला दोन जागा देण्याची भाषा करीत होती. मात्र, भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर पराभव पुढे दिसताच काँग्रेसने चार जागा वंचित आघाडीला देण्याची तयारी दर्शवली. हा किंचित बदल काँग्रेसमध्ये झाल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट आहे.
राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष कसा?
२०१४ ची विधानसभा निवडणूक झाल्यावर राष्ट्रवादीने महाराष्ट्रात भाजप सरकार आणण्यात पूर्ण मदत केली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस धर्मनिरपेक्ष समजतो, याचे आश्चर्य वाटत असल्याचा टोला अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रातून लगावला. अर्थात तो प्रश्न काँग्रेसचा असल्याचे मत व्यक्त करण्यातही ते विसरले नाहीत.